Bhimashankar Temple: पुणे: महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर पुढील तीन महिने भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे भीमाशंकरला जाण्याचा विचार करणाऱ्या भाविकांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 1 जानेवारीपासून भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुढील तीन महिने मंदिरात विकास आराखड्यातील कामे केली जाणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार ही कामे हाती घेण्यात येत आहेत.
मंदिरात नूतनीकरणाचे काम सुरु
भीमाशंकर विकास आराखड्यानुसार मुख्य मंदिरातील सभामंडपाचे नूतनीकरण आणि इतर संरचनात्मक कामे केली जाणार आहेत. ही कामे सुरू असताना भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुख्य मंदिर दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दररोज भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. ही गर्दी लक्षात घेऊन कामकाजाच्या काळात मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार नाही. याबाबत पुढील काही दिवसांत प्रशासकीय पातळीवर पाहणी करून नियोजन केले जाणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यातील कामांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
सध्या ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक सहलीचे नियोजन करत आहेत. या काळात भीमाशंकरला भेट देण्याचा विचार करणाऱ्यांनी 1 जानेवारीपूर्वी दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील तीन महिने मंदिर बंद राहणार असल्याने भाविकांनी आपले नियोजन त्यानुसार करावे, असे मंदिर प्रशासनाने कळवले आहे.






