भिगवण : भिगवण शहरात आज दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भिगवण शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील रस्त्यावर सज्ञान मुलीचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी हारून शेख व आयान हारून शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी तिच्या आई व भावासह दुचाकीवरून आपल्या घरी निघाली होती. शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील रस्त्यावर येताच चारचाकी वाहनातून आलेल्या संशयित आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. अचानक हल्ला करत आरोपींनी मुलगी, तिची आई व भावाच्या डोळ्यात चटणीची पूड फेकली.
यानंतर मुलीच्या आई व भावाच्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. दोघेही जखमी अवस्थेत असताना आरोपींनी मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात ओढून बसवले व तेथून पसार झाले. घटनेनंतर जखमी कुटुंबीयांनी तात्काळ भिगवण पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. त्यानुसार हारून शेख व आयान हारून शेख यांच्या विरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर घटनेची गंभीर दखल घेत बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार हे भिगवण येथे दाखल झाले असून त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स तसेच संभाव्य मार्गांवर नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे भिगवण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.







