पुणे: पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. सिंहगड, दत्तवाडी आणि मुंढवा वाहतूक विभागाच्या हद्दीत हे बदल लागू होणार असून, त्याबाबत प्रशासनाने नागरिकांना माहिती दिली आहे. वाहतूक कोंडी कमी करणे आणि वाहनांची ये-जा अधिक व्यवस्थित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

भूमकर चौकातून सर्व्हिस रोडने स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिराच्या बाजूने भूमकर चौकाकडे येणारा सर्व्हिस रोड एकेरी करण्यात येईल. तसेच मंदिरासमोरील सर्व्हिस रोडला जोडणाऱ्या पुलावर भूमकर चौकाकडून मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मंदिराच्या दिशेने पुलावरून भूमकर चौकाकडे येणाऱ्या वाहनांना या मार्गावर प्रवेश करता येणार नाही.

दत्तवाडी वाहतूक विभागाच्या हद्दीत सदाशिव पेठ परिसरातील एस.पी.एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलसमोरील सुमारे 50 मीटरच्या अंतरात P-1 आणि P-2 पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय मुंढवा वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रातील आर्मी गेट आणि मेरिट सूट परिसरातील राईट टर्न बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

नवीन वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांना काही सूचना किंवा हरकती असल्यास त्या 21 सप्टेंबरपर्यंत लेखी स्वरूपात वाहतूक नियंत्रण शाखेकडे सादर करता येणार आहेत. नागरिकांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.







