संतोष पवार

पुणे : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथून निघालेली पळसनाथ दिंडी भक्तीमय वातावरणात विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीसाठी रवाना झाली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या पायी दिंडीत हजारो भाविकांनी सहभागी होऊन हरिनामाचा गजर केला.

स्वर्गीय प्रकाश भगवानराव काळे यांनी सुरू केलेली ही दिंडी परंपरा पळसदेव ग्रामस्थांनी सलग 21 व्या वर्षीही मोठ्या श्रद्धेने पुढे चालवली आहे. या दिंडीत दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांनी पळसदेव ते विठ्ठलवाडी हे सुमारे 9 किलोमीटरचे अंतर टाळ-मृदुंगाच्या तालावर विठूनामाचा जप करत पायी पूर्ण केले.

पळसनाथ महाराजांच्या पवित्र पादुका डोक्यावर घेऊन मंदिराचे पुजारी आणि वारकरी विठ्ठलवाडीच्या दिशेने निघाले. ही दिंडी पुणे-सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्याने काळेमत्रे वस्ती आणि काळेवाडी नंबर 1 व 2 मार्गे पुढे गेली. रस्त्यात अनेक ठिकाणी तरुण मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी चहा, फराळ व अल्पोपाहाराची उत्तम व्यवस्था केली होती.
विठ्ठलवाडी येथे पोहोचल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पळसनाथ महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. भजन, प्रवचन आणि हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दर्शन घेतल्यानंतर भाविकांना परत जाण्यासाठी पळसनाथ विद्यालयाच्या वतीने बसची मोफत सोय करण्यात आली होती.
या सोहळ्यात पळसनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, राजेंद्र काळे, मंदिराचे पुजारी शशिकांत भैरवकर यांच्यासह अनेक स्थानिक प्रमुख नागरिक, ग्रामस्थ आणि महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







