पुणे : भारतीय जनता युवा मोर्चाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा मंगळवारी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष आणि वडोदराचे खासदार हेमांग जोशी यांनी या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. या नव्या रचनेमध्ये महाराष्ट्रातील 3 तरुण नेत्यांना महत्त्वाची संधी देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका सायली रघुनाथ कुलकर्णी यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवत त्यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड केली आहे. यासोबतच सांगलीचे वीरेंद्र पृथ्वीराज पाटील आणि मुंबईतील गुरदित सिंह वोहरा यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनवण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या केंद्रीय पातळीवर महाराष्ट्रातील युवा नेतृत्वाला मजबूत स्थान मिळाले आहे.

नव्या चमूमध्ये देशातील विविध राज्यांतील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 7 जणांकडे राष्ट्रीय उपाध्यक्ष तर 3 नेत्यांकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी निवड झालेल्या प्रमुख नेत्यांमध्ये जम्मू-काश्मीरच्या आमदार शगुन परिहार आणि पश्चिम बंगालचे आमदार सौमेन कर्फा यांचा समावेश आहे. त्यांच्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशचे निखिल मणी तिवारी, नागालँडचे अरविंद दमानी, तेलंगणाचे मलोथ कोमाली नाईक, बिहारचे राजेंद्र सिंह आणि छत्तीसगडचे भूपेंद्र नाग यांचीही उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.

बिहारमधील प्रसिद्ध लोकगायिका आणि आमदार मैथिली ठाकूर यांना कार्यकारिणीत सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. त्यांच्यासोबतच देशभरातील आणखी 33 युवा नेत्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.या नव्या कार्यकारिणीत राष्ट्रीय उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सचिवांबरोबरच प्रसारमाध्यम व सोशल मीडिया विभागांसाठी स्वतंत्र नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. देशातील युवा ताकदीला पक्षसंघटनेशी जोडण्याच्या उद्देशाने या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.






