उरुळी कांचन : उरुळी कांचन-जेजुरी राज्य मार्गावरील शिंदवणे घाटात टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने अपघाताची घटना घडली. या अपघातात टेम्पोचा चालक केबिनमध्ये अडकला होता. मात्र, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत चालकाला टेम्पोमधून सुखरूप बाहेर काढले. या घटनेत चालकाचा जीव वाचला असून टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी बाजूकडून उरुळी कांचन बाजूकडे एक टेम्पो सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास निघाला होता. शिंदवणे घाटातून जात असताना टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. अपघातानंतर चालक केबिनमध्ये अडकल्याने काही काळ परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र, परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करत चालकाला बाहेर काढले. सुदैवाने चालक सुखरूप असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. जखमी चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातामुळे परिसरात अपघात झालेला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.








