शिरूर: कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच शेतकऱ्याला मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने शिरूर पोलीस ठाण्यांतर्गत टाकळी हाजी पोलीस चौकी पुन्हा चर्चेत आली आहे. चौकशीच्या नावाखाली पोलिस चौकीत बोलावून कानाखाली मारणे, शिवीगाळ करणे, मोबाईल हिसकावून घेणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप ३४ वर्षीय शेतकरी रावसाहेब सुखदेव घोडे (रा.टाकळी हाजी, ता.शिरूर,जि.पुणे) यांनी केला आहे. याप्रकरणी पीडित शेतकऱ्याने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

घोडे यांच्या तक्रारीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी शेतीच्या वादातून चुलतभावाच्या कुटुंबीयांशी वाद झाला होता. दोन्ही बाजूंनी पोलीस चौकीत तक्रारी दिल्यानंतर मध्यस्थीने वाद मिटविण्यात आला. मात्र, ५ नोव्हेंबर रोजी पोलीस हवालदार वायाळ यांच्या फोनवरून रावसाहेब घोडे यांना चौकशीसाठी पोलिस चौकीत बोलावण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांनी दमदाटी करत कानाखाली मारल्याचा, मोबाईल हिसकावल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत घोडे यांच्याकडून करण्यात आला आहे. या मारहाणीत कानाने कमी ऐकू येत असून जबड्याला सूज व वेदना झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्याची घटनेपूर्वीच शिरूरच्या डीबी पथकात बदली झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे बदली आदेश, कार्यमुक्ती आणि चौकशी करण्याच्या अधिकारांचीही पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकीतील सीसीटीव्ही फुटेज, स्टेशन डायरी आणि वैद्यकीय अहवाल तपासण्याची मागणी करण्यात आली असून, यापूर्वी जांबुत येथील मारहाणीच्या गुन्ह्यातही संबंधित अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, याबाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, “या प्रकरणाचा तपास सुरू आहे,” अशी संक्षिप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. आता या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी होते का आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.







