पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात दुचाकीला कारची धडक लागल्यानंतर मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातानंतर संतापलेल्या महिलेने कारचालकाशी वाद घालत थेट चप्पल काढून त्याला मारहाण केली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेची चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बाणेर रस्त्यावरून दुचाकीने जात होती. त्याचवेळी मागून आलेल्या एका भरधाव कारने तिच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे महिला रस्त्यावर पडली. सुदैवाने तिला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, अचानक झालेल्या अपघातामुळे ती प्रचंड संतापली.
यानंतर महिला आणि कारचालक यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच वाद वाढला आणि महिलेने पायातील चप्पल काढून कारचालकाला मारहाण केली. हा प्रकार पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची गर्दी जमली. या गोंधळामुळे बाणेर परिसरातील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.







