आळंदी : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये भरवस्तीत एका तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आळंदी नगर परिषद परिसरात हा प्रकार घडला. दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्रे घेऊन तरुणाचा पाठलाग केला आणि त्याच्यावर वार केले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर हातात धारदार कोयते आणि शस्त्रे घेऊन एका तरुणाच्या मागे लागले. जीव वाचवण्यासाठी तरुण भरवस्तीतून पळत असताना हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. त्याला गाठल्यानंतर दोघांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले.
या हल्ल्याचा थरार परिसरातील कॅमेऱ्यात कैद झाला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुण एका व्यक्तीचा पाठलाग करताना आणि त्याच्यावर हल्ला करताना दिसत आहेत. वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रात सकाळच्या वर्दळीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.






