मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बॉम्बच्या धमक्या देण्याचे सत्र सुरूच आहे. या मालिकेत आता मुंबईतील महत्त्वाच्या बँकांचाही समावेश झाला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची फोर्ट शाखा, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक अशा एकूण 6 बँक शाखांना एकाच वेळी बॉम्बने उडवून देण्याचे ई-मेल मिळाल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला या गंभीर प्रकाराची माहिती देण्यात आली. एकाच वेळी अनेक बँकांना असे ई-मेल प्राप्त झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने सतर्क झाले असून संबंधित ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे.
यापूर्वीच मुंबई महानगरपालिका, महापौर कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सीएसएमटी बस स्थानक यांसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करण्याचे धमकीचे संदेश आले होते. मुंबईपाठोपाठ पुणे महापालिकेच्या इमारतीतही बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याने संपूर्ण राज्यात सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती.

मागील अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागांत अशा प्रकारच्या बनावट किंवा संशयास्पद धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. सतत येणाऱ्या या ई-मेल्समुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पोलीस दलाने या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून ई-मेल पाठवणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्व संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.







