आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर तहसील कार्यालयातील कथित अनागोंदी कारभार आणि तहसीलदारांच्या कार्यपद्धतीविरोधात आता सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. सामान्य नागरिकांची कामे, प्रशासकीय कामकाजातील कथित अडवणूक आणि नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत बुधवारी (ता. २५) इंदापुरात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदापूर नगरपरिषदेपासून प्रशासकीय भवनापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून, हजारो नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप नेते प्रदीप गारटकर यांनी केले आहे.
या मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला भाजप नेते प्रदीप गारटकर, भाजपचे नेते व माजी सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महारुद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते तानाजी धोत्रे, शेतकरी संघटनेचे नीलेश देवकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास शेळके, शरद चितारे, शिवसेनेचे नितीन शिंदे, महादेव सोमवंशी, किरण गानबोटे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले, “आमचा तहसीलदार या व्यक्तीला विरोध नाही; मात्र त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर आमचे प्रश्नचिन्ह आहे. तहसील कार्यालयात नेमके कोणाचे ऐकले जाते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांवर अन्याय होत असेल, तर तो सहन केला जाणार नाही. विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचा अपमान होत असल्याच्या तक्रारी आहेत. पैशांच्या जोरावर कामे होत असतील, तर सामान्य गरीब जनतेने न्यायासाठी कोणाकडे पाहायचे?”
प्रशासकीय कामकाजात सामान्य नागरिकांची होणारी कथित अडवणूक थांबविण्याची गरज असल्याचे सांगत गारटकर यांनी, न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेतही दोन्ही बाजूंनी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचा आरोप केला. हा विषय केवळ तहसील कार्यालयापुरता मर्यादित नसून इतर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही नियमानुसार कामकाज करावे. अन्यथा नागरिकांच्या प्रश्नांवर सर्व कार्यालयांतील अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच, संबंधित अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी उपस्थित असतील, तर त्यांच्याकडेच निवेदन देण्यात येईल, असेही गारटकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, माजी सभापती प्रवीण माने, महारुद्र पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनीही तहसील कार्यालयातील कामकाजामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत नाराजी व्यक्त केली. सामान्य नागरिकांना सन्मानाने, पारदर्शकपणे आणि नियमानुसार शासकीय सेवा मिळावी, यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
तहसीलदार म्हणतात, अपूर्ण कागदपत्रांमुळेच कामे प्रलंबित
दरम्यान, याबाबत तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सांगितले की, प्रस्तावित मोर्चाबाबत तहसील कार्यालयाला अद्याप कोणतेही अधिकृत पत्र किंवा तक्रार अर्ज प्राप्त झालेला नाही. तहसील कार्यालयात कोणाचेही काम जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जात नाही. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्यास संबंधित काम पूर्ण करता येत नाही. नागरिकांच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी लेखी अर्ज द्यावा किंवा वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागावी. प्रशासनाकडून कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.







