पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाचा किंवा प्रतिमेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांना आता राज्य सरकारने कडक दणका दिला आहे. दादांच्या निधनानंतर त्यांच्या नावाचा वापर करून संस्था, ट्रस्ट किंवा फाऊंडेशन स्थापन करण्याचा जणू पूर आला आहे. मात्र, या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि नावाचा व्यावसायिक स्वार्थासाठी होणारा संभाव्य गैरवापर रोखण्यासाठी सरकारने आता ‘कौटुंबिक संमती’ अनिवार्य केली आहे.

अजितदादांच्या निधनानंतर जनमानसातील त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने शैक्षणिक संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट किंवा सामाजिक संघटना नोंदणी करण्यासाठी अर्ज येत आहेत. प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, काही व्यक्ती किंवा गट भावनेचा आधार घेऊन स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी या नावाचा वापर करण्याची शक्यता आहे.ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
धर्मादाय आयुक्तांना दिलेल्या निर्देशानुसार, आता कोणत्याही नवीन संस्थेला ‘अजितदादा’ यांचे नाव लावायचे असल्यास पवार कुटुंबाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) सादर करावे लागेल. हा नियम केवळ नवीन संस्थांनाच नाही, तर जुन्या संस्थांना नाव बदलण्यासाठीही लागू असेल.

केवळ संस्थाच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी पुतळे किंवा स्मारके बांधतानाही कडक निकषांचे पालन करावे लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, दादांच्या नावाचा वापर करून बेकायदेशीररीत्या निधी गोळा करणाऱ्या संशयास्पद संस्थांची आता सखोल चौकशी केली जाणार आहे.







