उरुळी कांचन, ता. 30 : “अजित दादा पवार यांचे नेतृत्व हे महाराष्ट्राच्या (Ajit Pawar Death) राजकारणाला दिशा देणारे होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची, प्रशासनावर असलेल्या पकडीची आणि लोकहितासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांची उणीव कायम जाणवेल. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक ठरतात.” असे मत कृषिराज उर्फ मनोज दत्तात्रय चौधरी यांनी केले. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. 30) सकाळी नायगाव (ता. हवेली) येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीचे उमेदवार कृषिराज उर्फ मनोज चौधरी बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोरेगाव मूळ गटातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुरेखा हरगुडे, कोरेगाव मूळ गणातील पंचायत समितीचे उमेदवार कृषिराज उर्फ मनोज चौधरी, राहुल चौधरी, बाबूशेठ केसकर, विजय चौधरी, बाळासाहेब आप्पा चौधरी, अमोल चौधरी विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून अजित दादा पवार यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.

शोकसभेत उपस्थित वक्त्यांनी अजित दादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा आढावा घेतला. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी तत्पर राहणारे, ग्रामीण विकासाला प्राधान्य देणारे आणि विकासाभिमुख धोरणे राबवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, सिंचन, पायाभूत सुविधा, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न राज्याच्या इतिहासात उल्लेखनीय असल्याचेही अनेकांनी मत व्यक्त करीत आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, या प्रसंगी मान्यवरांनी अजित दादा पवार यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या तसेच त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात श्रद्धांजली सभेचा समारोप करण्यात आला.






