पुणे: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ओळख झाली, प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, लग्नानंतर पतीकडून छळ सुरू झाल्याचा आरोप एका विवाहितेने केला आहे. माहेरून 40 लाख रुपये, फ्लॅट आणि कार आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच सर्व्हिस वेपनचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही महिलेने पोलिसांकडे केली आहे.

या प्रकरणी पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पतीसह अन्य एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शेषेराव राठोड (वय 29, रा. जयराम तांडा, पाचेगाव सर्कल, ता. गेवराई, जि. बीड) आणि राजू पवार (वय 40, रा. बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

धनकवडी येथे राहणाऱ्या 31 वर्षीय विवाहितेने यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार, संबंधित महिला आणि राहुल राठोड यांची 2022 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले आणि दोघांनी विवाह केला.

मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पतीने माहेरून पैसे आणि मालमत्ता आणण्याची मागणी सुरू केल्याचा आरोप महिलेने केला आहे. 40 लाख रुपये रोख, राहण्यासाठी फ्लॅट आणि महागडी कार मिळावी, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मागण्यांमुळे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही तिने म्हटले आहे.
पतीने सर्व्हिस वेपनचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या प्रकारामुळे असुरक्षित वाटू लागल्याने तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. सहकारनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होईल.








