पुणे: गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने पुणे शहरातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. उत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, ध्वनीप्रदूषण आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेट देत उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी विविध भागांतील पोलीस उपायुक्त, महापालिकेचे अधिकारी तसेच पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या संयुक्त पाहणी दौऱ्याची सुरुवात पुण्याच्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीपासून करण्यात आली. अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. उत्सव काळात कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, याबाबतही माहिती घेण्यात आली.

यंदा पुण्यात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत असल्याने पोलिसांनी मंडळांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. उत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.

महापालिका प्रशासनाकडून मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे, रस्त्यांवरील अडथळे, वीज व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांची पाहणी करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
महिला सुरक्षेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त, दामिनी पथक आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी ठेवण्याबाबतही चर्चा झाली. तसेच गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो आणि इतर वाहतूक यंत्रणांशी समन्वय साधण्यावर भर देण्यात आला.
पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी प्रशासनाने तयारी अधिक वेगाने सुरू केली आहे.







