पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे पक्ष बदलल्याचे सांगितले. मात्र, शरद पवार यांचे अनेक वर्षे विश्वासू सहकारी राहिलेले माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आपण शरद पवारांपासून दूर जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

डिंभे धरणातून माणिकडोहपर्यंत प्रस्तावित असलेल्या सुमारे 16 किलोमीटरच्या बोगद्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या प्रकल्पामुळे आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी आपल्या राजकीय निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली.

वळसे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, डिंभे धरणातून प्रस्तावित बोगदा रद्द करण्याचे आश्वासन त्यांना मुख्यमंत्र्यांकडून मिळाले होते. शेतकऱ्यांचे पाणी सुरक्षित राहावे आणि हा प्रकल्प थांबवला जावा, या मुद्द्याला त्यांनी महत्त्व दिले. याच आश्वासनामुळे आपण शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आपण अशा तिघांची बैठक झाली होती, असा दावाही वळसे पाटील यांनी केला. या चर्चेदरम्यान प्रस्तावित बोगदा होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर वळसे पाटील शरद पवारांची साथ सोडणार नाहीत, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र, त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता तीन वर्षांनंतर त्यांनी या निर्णयामागे डिंभे-माणिकडोह बोगद्याचा मुद्दा असल्याचे सांगितल्याने राजकीय चर्चेला पुन्हा वेग आला आहे.






