लोणी काळभोर, ता. ४ : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात मंगळवारी (ता. १० सप्टेंबर २०२४) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हडपसर विभागाच्या तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या आदेशान्वये लोणी काळभोर व मुंढवा पोलिसांनी संयुक्त छापा टाकून इंधनचोरीचे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच तीन टँकर, दोन आयशर, एक कार आणि सुमारे १,८०० लिटर इंधन असा एकूण ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी (ता. ३) सासवड (ता. पुरंदर) येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

राहुल गजानन काळभोर (वय ४०, रा. तरवडी रानमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी शुभम सुशील भगत (वय २३, रा. बोरकरवस्ती, थेऊर फाटा), तृशांत राजेंद्र सुंभे (वय ३१, रा. बँक ऑफ बडोदाजवळ, थेऊर फाटा), रवी केवट (वय २५, रा. बोरकरवस्ती, माळीमळा), विशाल सुरेश गोसावी (वय ३०, रा. वाणीमळा, थेऊर फाटा), किरण हरिभाऊ आंबेकर (वय ३१, रा. कदमवाकवस्ती) आणि रोहित कुमार (वय २१, रा. बोरकरवस्ती, माळीमळा) यांना अटक केली होती. या प्रकरणी पोलीस अंमलदार मल्हारी शिवाजी ढमढेरे यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या आदेशान्वये लोणी काळभोर व मुंढवा पोलिस पेट्रोल-डिझेल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी लोणी काळभोर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कंपनीमधून पेट्रोल व डिझेल भरून टँकर विविध पेट्रोल पंपांकडे रवाना होत असल्याची माहिती त्यांच्याकडे होती.

कंपनीकडून टँकरचा मार्ग व वेळ निश्चित करण्यात येते. तसेच कंपनीच्या परिसरातून बाहेर पडल्यानंतर टँकरमधून इंधन काढता येऊ नये, यासाठी टँकर कंपनीतच लॉक करून पाठविले जातात. असे असतानाही कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाट्याजवळ तुकाराम धुमाळ यांच्या घरामागील पत्र्याच्या शेडमध्ये टँकर उभे करून त्यामधून पेट्रोल-डिझेल चोरी केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला.
छापा टाकल्यानंतर पोलिसांना त्या ठिकाणी तीन टँकर उभे असल्याचे दिसून आले. त्यापैकी एक हिंदुस्थान पेट्रोलियम, दुसरा इंडियन ऑईल कंपनीचा, तर तिसऱ्या टँकरवर कोणत्याही कंपनीचे नाव नव्हते. काही वेळाने धुमाळ मळ्याकडून एक झेन कार घटनास्थळी आली. त्यातून उतरलेल्या व्यक्तीने पाईप जोडलेली इलेक्ट्रिक मोटार बाहेर काढून टँकरमधून डिझेल काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार दिसू नये म्हणून दोन आयशर ट्रक आडोशाला उभे करण्यात आले होते. इलेक्ट्रिक मोटार आणि पाईपच्या साहाय्याने डिझेल प्लास्टिकच्या बॅरलमध्ये भरताना पोलिसांनी सहा जणांना रंगेहाथ पकडले.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे १,६२० लिटर डिझेल, तीन टँकर, दोन आयशर, एक कार आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी सरकारी माल असलेल्या डिझेलचा अपहार करून त्याची चोरी केली होती. तसेच अत्यावश्यक आणि ज्वलनशील असलेले डिझेल बेकायदेशीररित्या साठवून काळ्या बाजारात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपींविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ अधिनियमासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, चोरी केलेले इंधन गावातील नागरिकांना विकून पैसे कमावत असल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच हा इंधनचोरीचा अड्डा श्रीकांत ऊर्फ सोन्या राजेंद्र सुंभे यांच्या मालकीच्या जागेवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय प्रविण सिद्राम मडीखांबे (रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) व त्याचे साथीदार या इंधनचोरी रॅकेटला मार्गदर्शन व मदत करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. चोरीचे इंधन विकून मिळणारा मोबदला सर्व आरोपी आपापसात वाटून घेत असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रविण मडीखांबे यालाही अटक केली होती. मात्र, राहुल गजानन काळभोर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सुरू असताना राहुल काळभोर हा सासवड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. ही कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, सुरज कुंभार, प्रवीण धडस आणि सचिन सोनवणे यांनी केली.







