हडपसर (पुणे) : पुणे–सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी (ता. हवेली) परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला दुचाकीची जोरदार धडक बसल्याची घटना घडली. या अपघातात मुलगा जखमी झाला असून, अपघातानंतर तब्बल दीड तास उलटूनही 108 या नंबरवर वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिक आणि पोलिसांनी संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण कार्यालयाजवळ एक अल्पवयीन मुलगा रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने त्याला धडक दिली. या धडकेत मुलगा जखमी झाला. यावेळी पाठीम्गुन येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी त्याच्या पायावरून गेली. अपघात करून गेलेल्या दोन्ही दुचाकी न थांबता मदत न करता तसेच पोलिसांना माहिती देता तश्याच पुढे निघून गेल्या. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी मांजरी पोलिसांना दिली. त्यानुसार मांजरी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी परिसरातील तरुण आणि पोलिसांनी तातडीने 108 या रुग्णवाहिका सेवेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला. मात्र, दीड तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. त्यामुळे जखमी मुलाला उपचारासाठी वेळेत मदत मिळू शकली नाही.
या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आणि पोलिसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी असलेली 108 रुग्णवाहिका सेवा इतक्या उशिरा मिळत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, जखमी मुलगा अल्पवयीन असून तो परप्रांतीय असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू आहे.







