लोणी काळभोर, ता. ११ : ‘ज्ञानोबा… तुकाराम’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. लाखो वारकऱ्यांसह पुण्यातून प्रस्थान केलेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी (ता. ११) सायंकाळी ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर-कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी तळावर भक्तिमय वातावरणात दाखल झाला. यावेळी पंचक्रोशीत जणू भक्तीचा महासागर उसळल्याचा अनुभव भाविकांना आला. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. हजारो भाविकांनी ‘याची देही, याची डोळा’ हा अद्वितीय सोहळा अनुभवत संतांच्या पालखीचे दर्शन घेतले. ग्रामस्थांसह विविध सामाजिक संस्था, संघटना आणि सेवाभावी मंडळांनी फुलांची उधळण करत पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले.

पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिरात शनिवारी सकाळी विधिवत पूजन झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी रथात विराजमान करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा पुलगेटमार्गे हडपसरकडे मार्गस्थ झाला. गाडीतळ येथे विसावा घेतल्यानंतर सोहळ्याने पुणे-सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोरच्या दिशेने प्रस्थान केले. शेवाळेवाडी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त स्वागताचा स्वीकार करून पालखी मांजरी बुद्रुक येथे दुपारच्या विसाव्यासाठी थांबली. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ताजेतवाने झालेले वारकरी, टाळकरी आणि फडकरी विठ्ठलनामाचा अखंड गजर करत उत्साहाने पुढे मार्गक्रमण करत होते. पंढरीच्या ओढीने भारावलेले लाखो वारकरी भक्तीरसात चिंब होत महामार्गावरील प्रत्येक टप्पा पार करत होते.

दुपारचा विसावा संपल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोहोचताच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि *’ज्ञानोबा-तुकाराम’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’*च्या जयघोषात पालखीचे स्वागत केले. यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, जिल्हा परिषद सदस्या शीतल कांबळे, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, सुषमा मुरकुटे, कृषिराज चौधरी, कोमल कांबळे, नगरसेविका हेमलता मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, गुलाब चौधरी, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासेर पठाण, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे, ग्रामसेवक अमोल घोळवे, श्रीकांत वाव्हळ, माजी उपसरपंच देविदास कदम, सुशील महाराज काळभोर, गौरव काळभोर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कवडीपाटहून पुढे निघालेला पालखी सोहळा लोणी स्टेशन चौकात सायंकाळी सहाच्या सुमारास पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जयघोषात त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी लोणी काळभोर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सचिन काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष आबासाहेब कांचन आणि माजी सरपंच योगेश काळभोर यांनी पालखीचे स्वागत केले. लोणी स्टेशन येथील अल्प विश्रांतीनंतर पालखी सोहळा सायंकाळी साडेसातच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर मुक्कामी दाखल झाला. सार्वजनिक आरतीनंतर विठ्ठलनामाच्या अखंड गजरात ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामाची सांगता झाली.
ग्रामपंचायत कदमवाकवस्ती, पंचायत समिती हवेली, अतुल कदम, समस्त कवडीपाट माळवाडी मित्र मंडळ, जेके इलेक्ट्रॉनिक्स, रेम्बो इंटरनॅशनल स्कूल, जय गणेश ७६ उद्योग समूह आणि संजय नर्सरी यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. सौभाग्य मित्र मंडळ (लोणी काळभोर), अखिल कदमवाकवस्ती व लोणी काळभोर शिवसेना, राष्ट्रीय हॉकीपटू सतीश दत्तात्रय काळभोर आणि लोणी स्टेशन येथील श्री गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने फराळ, फळे, चहा-बिस्कीट तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधांचे वितरण करण्यात आले. तसेच रोहन सपकाळ आणि बाळासाहेब सपकाळ यांनी परंपरेनुसार संतांच्या पालखीला बांबूची शिडी अर्पण करून वारीची परंपरा जपली.
योगिनी एकादशीच्या निमित्ताने अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट, अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठान, विश्वरत्न फाउंडेशन, संत निरंकारी मंडळ, शीतलाशक्ती मंडळ, तिरंगा मित्र मंडळ, शिवशक्ती मंडळ, जय बजरंग तरुण मंडळ, संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट, जय महाराष्ट्र तरुण संघटना, जय जवान ग्रामविकास प्रतिष्ठान, राजा शिवछत्रपती तरुण मंडळ, महात्मा फुले मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, समता समाजसेवा तरुण मंडळ, क्रांतिवीर मित्र मंडळ, श्रीमंत अंबरनाथ तरुण मंडळ, महात्मा गांधी मित्र मंडळ तसेच मुस्लिम आणि शीख समाजबांधवांसह विविध सेवाभावी संस्थांनी वारकऱ्यांना चहा, खिचडी, चिवडा, केळी आणि इतर उपवासाच्या पदार्थांचे वाटप केले.
रात्रभर सुरू असलेल्या भजन, कीर्तन, प्रवचन, जागर आणि हरीनाम सप्ताहामुळे संपूर्ण लोणी काळभोर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. पालखी तळावर संतांच्या पालखीचा मुक्काम असला तरी सोहळ्यातील अनेक दिंड्यांनी गावातील मंदिरे, शाळा, महाविद्यालये आणि नेहमीच्या मुक्कामस्थळी मुक्काम केला. संपूर्ण पालखी सोहळ्यात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवत सोहळा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी विशेष दक्षता घेतली.







