लोणी काळभोर, ता. २८ : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत १७ वर्षीय विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी फोनवर वारंवार बोलत असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरुद्ध पॉक्सोसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या ३९ वर्षीय आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलही हि लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शैक्षणिक संकुलात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलीची आणि आरोपीची शालेय शिक्षणादरम्यान ओळख झाली होती. इयत्ता सहावी ते आठवीदरम्यान दोघे एकाच शाळेत शिकत होते. त्यानंतर संपर्क तुटला होता.
दरम्यान, मे २०२५ मध्ये बारावीच्या उन्हाळी क्लासदरम्यान आरोपीने मुलीच्या मोबाईलवर संपर्क साधला. “तुझे काही फोटो माझ्याकडे आहेत,” असे सांगून त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. सुरुवातीला मुलीने दुर्लक्ष केले; मात्र फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने ती घाबरली व आरोपीला भेटली.आरोपीने मुलीला शेवाळवाडी, हडपसर येथील एका लॉजवर नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तसेच फोटो व्हायरल करण्याची भीती घालून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर अनेक वेळा त्याने अशाच प्रकारे लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.
याच काळात आरोपी मुलीला सतत फोन व मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होता. “घडलेला प्रकार घरी सांगीन,” अशी धमकी देत तो तिच्याशी संपर्क ठेवत होता. अखेर मुलगी फोनवर बोलताना आईला संशय आल्याने तिने विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी संपूर्ण प्रकार समोर आला.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023चे कलम 137(2), 64(2), 64(2)(m), 351(1)व बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत.






