सोलापूर, ता. 14 : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी हृदयद्रावक दुर्घटना घडली. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारी पिकअप जीप विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील १६ जण अमावस्येनिमित्त म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना तांदूळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप जीप रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले. जखमी दोघांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातातील मृत सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील असून, बहुतांश मृतांचे आडनाव सुरवसे असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच विविध लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. या भीषण दुर्घटनेमुळे रांजणी गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली असून, एकाच गावातील १४ जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.







