Pune Crime : वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत साठवून ठेवलेल्या अवैध गुटखा विक्री व साठ्यावर पोलिसांनी कडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. शनिवारी (ता. 13) हि कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

याप्रकरणी पोलिसांनी शाहिद जहीर मलीक (वय-28, रा. खराडी, पुणे, मुळगाव उत्तरप्रदेश) व अरफात इसतीयाक अंसारी (वय-20, रा. वाघोली, पुणे, मुळगाव पालघर, ठाणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 11 लाख 34 हजार 816 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक गस्त घालीत होते. गस्त घालताना गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार लांडे व तनपुरे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून वाघोली येथे शाहिद मलीक व अरफात अंसारी यांना त्यांचे ताब्यातील पिकअप व अॅक्टीव्हा सह ताब्यात घेतले.
आरोपींच्या ताब्यातील अॅक्टीव्हा व महिंद्र पिकअप वाहनांची तसेच खराडी येथील त्यांच्या गोडाऊनची झडती घेतली असता विमल, गोवा, तानसेन, काका, आर.एम.डी. आदी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखू असा 5 लाख 14 हजार 816 रुपयांचा साठा आढळून आला. तसेच पिकअप, अॅक्टीव्हा व वापरते मोबाईल फोन असा मिळून तब्बल 11 लाख 34 हजार 816 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, आरोपींविरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 3(5) तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 चे कलम 26 (2)(i), 26(2)(iv), 27 (3)(c) व 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, गिरीश नाणेकर, सारंग दळे, सुहास तांबेकर, संभाजी सकटे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तानपुरे, नेहा तापकीर, प्रतीक्षा पानसरे, यांचे पथकाने केलेली आहे.







