Yavat News : यवत (ता. दौंड) : मस्करीत सुरू असलेल्या गप्पांमधून गैरसमज निर्माण झाल्याने तिघांनी दगडाने व लाथाबुक्क्यांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. सहजपूर-माकरवस्ती येथे रविवारी (ता. 01) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय प्रकाश चव्हाण (वय 27, रा. सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवाजी रोहीदास सोनकांबळे, लौकिक शिवाजी सोनकांबळे व सुनिता शिवाजी सोनकांबळे (रा. सर्व सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड) यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चव्हाण हे रविवारी (ता. 01) पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी येत असताना त्यांचा चुलत भाऊ अमोल चव्हाण याच्यासोबत घराजवळ मस्करीत गप्पा मारत होते. त्यावेळी अचानक शिवाजी सोनकांबळे तेथे आले आणि ‘तु मला शिवीगाळ का केली?’ असे विचारले. त्यावर चव्हाण यांनी, “मी तुम्हाला शिवी दिली नाही. माझ्या आणि माझ्या भावामध्ये मस्करीत बोलणे सुरू होते,” असे सांगितले. मात्र त्यानंतर सोनकांबळे यांनी शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
वाद वाढत असताना चव्हाण मोटारसायकलवरून निघत होते. त्यावेळी लौकिक सोनकांबळे यांनी त्यांच्या अंगावर माती फेकली. माती डोळ्यात गेल्याने चव्हाण यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. त्यानंतर लौकिक यांनी दगडाने त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच शिवाजी व सुनिता सोनकांबळे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेवेळी परिसरातील मित्रांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. डोक्याला दुखापत झाल्याने चव्हाण यांनी प्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले आणि नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.





