पुणे: तुळापूर येथील ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टी प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत पुणे पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली आहे.

रोहिणी खडसे यांनी म्हटले की, पोलिसांच्या माहितीनुसार या पार्टीत सुमारे 156 जण उपस्थित होते. मात्र कारवाई केवळ 78 जणांवरच का करण्यात आली, असा प्रश्न निर्माण होत आहे. उर्वरित 78 जणांना कोणत्या आधारावर सोडण्यात आले, याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच उपस्थितांपैकी फक्त 29 जणांचीच वैद्यकीय तपासणी का करण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यापूर्वीच्या एका प्रकरणाचा संदर्भ देत खडसे म्हणाल्या की, कमी संख्येने लोक उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला पोलिसांनी ‘रेव्ह पार्टी’ असे संबोधले होते. त्यावेळी सर्व संबंधितांना ताब्यात घेऊन विविध तपासण्या करण्यात आल्या होत्या. मात्र तुळापूरमधील प्रकरणात वेगळा निकष लावण्यात आल्याचे दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पार्टीसाठी परवानगी देण्यात आली होती, असा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी त्यासंदर्भातील कागदपत्रे अद्याप सार्वजनिक झालेली नाहीत, असेही खडसे यांनी म्हटले. तसेच कारवाईशी संबंधित कोणतेही दृश्य अथवा तपशील समोर आले नसल्याने या प्रकरणाबाबत अधिक पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात उपस्थित असलेल्या 23 तरुण-तरुणींचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे. तपास अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. संबंधितांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशनही केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या मात्र या तरुण-तरुणींविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.






