पुणे : औंध परिसरातील एका हॉटेलमध्ये हप्त्याची मागणी करत दारूच्या बाटल्या, फ्रिज आणि वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळीतील तिघांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ मुरकुटे अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे विलास राजू शिरतर (वय ३६), राहुल संजय कदम (वय २६) आणि अर्जुन राम डुकरे (वय १९) अशी आहेत. याप्रकरणी हॉटेलचे मालक अमोल बाबुराव धामनगावे (वय ३४, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामनगावे यांचे औंध येथील न्यू डीपी रोडवर ‘थ्री स्टार रेस्टॉरंट अँड बार’ आहे. २० मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुख्य आरोपी सौरभ मुरकुटे हा दोन साथीदारांसह हॉटेलमध्ये आला. त्यावेळी त्याने हॉटेल व्यवस्थापक राहुल मोरे यांना हॉटेल सुरू ठेवायचे असेल तर दरमहा २० हजार रुपये हप्ता आणि आपल्या साथीदारांना मोफत दारू देण्याची मागणी केली. व्यवस्थापकांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी मारहाणीची धमकी देत हॉटेलच्या शटरवर दगडफेक केली.
त्यानंतर १६ जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुरकुटे पुन्हा तीन साथीदारांसह हॉटेलमध्ये आला. सर्वांच्या हातात लाकडी दांडके होते. आरोपींनी हॉटेलमध्ये शिवीगाळ करत “मी इथला भाई आहे. मला पैसे चालू करायचे आणि माझ्या साथीदारांना फुकट दारू द्यायची,” अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी काऊंटरमागील रॅकमधील दारूच्या बाटल्या फोडल्या, फ्रिजची काच फोडली आणि हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकी तसेच एका चारचाकी वाहनाची तोडफोड केली.
घटनास्थळी नागरिक जमा झाल्यानंतर आरोपींनी मध्ये पडणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि वाहनातून पसार झाले.
या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुरकुटेच्या तिघा साथीदारांना अटक केली आहे. मुख्य आरोपी सौरभ मुरकुटे याचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी पुढील तपास करत आहेत.






