उरुळी कांचन, (पुणे) : “पर्यावरणपूरक उपक्रमांची जाणीवपूर्वक अंमलबजावणी ही आजच्या काळाची गरज आहे” असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्य वनसंरक्षक तथा सर्वोच्च न्यायालय गठीत पर्यावरण समितीचे सदस्य सदस्य सुनील लिमये यांनी केले.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील येथील ‘ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन’ संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन, बी. जी. शिर्के बाल विकास केंद्र उरुळी कांचन येथे रविवारी (ता. 04) करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुनील लिमये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिमये बोलत होते.
या महा रक्तदान शिबिरात रेकॉर्डब्रेक असे एकूण 945 रक्तदात्यांनी रक्तदान केले, यामध्ये 253 युवकांनी पहिल्यांदाच रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान दाखवले, तर 41 महिलांनीही रक्तदानात सक्रिय सहभाग नोंदवला. या शिबिरासाठी ससून ब्लड बँक, तर्पण ब्लड बँक, महा ब्लड बँक, आणि स्पंदन ब्लड बँक यांनी सहकार्य केले. रक्तसंकलनाची प्रक्रिया नियोजनबद्ध व सुरक्षित पद्धतीने पार पडली.
यावेळी उपवन संरक्षक पुणे विभागचे महादेव मोहिते, हवेलीचे ज्येष्ठ नेते व महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण युवक कौशल्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी, ज्येष्ठ नेते महादेव कांचन, राजाराम कांचन, अलंकार कांचन, संतोष कांचन, उरुळी कांचनचे सरपंच मिलिंद जगताप, माजी सरपंच संतोष कांचन, माजी उपसरपंच संचिता कांचन, सीमा तुपे, युवराज कांचन, उद्योजक जे.बी. सराफ, तुकाराम चौधरी, एकनाथ चौधरी, सुभाष टिळेकर, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, अजिंक्य कांचन, शांताराम चौधरी, किरण वांजे, शैलेश गायकवाड, शैलेश बाबर, शिवाजी नवगिरे, रमेश महाडिक, सोमनाथ बगाडे यांच्यासह परिवहन विभागाचे मोटार निरिक्षक कलमबरकर, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, परिसरातील पुढारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलमबरकर यांनी रस्ते वाहतुक सुरक्षिततेबद्द्ल मार्गदर्शन केले आणि वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबतची शपथ दिली. प्रमुख पाहुणे महादेव मोहिते यांनी आगामी काळात वन विभागाकडून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन कार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, तसेच शिंदवणे घाट परिसरात ऑक्सिजन पार्क उभारण्यासाठी वन विभाग सक्रिय भूमिका बजावेल अशी ग्वाही दिली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. के. डी. कांचन यांनी ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशनच्या समाजोपयोगी कार्यातील सातत्याचे विशेष कौतुक केले. संस्थेच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होत असून भविष्यातही स्थानिक संस्था, ग्रामपंचायत आणि नागरिकांचे पूर्ण सहकार्य व सक्रिय सहभाग राहील असे सांगितले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शेलार यांनी केले. प्रास्ताविक निलेश जाधव यांनी ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशनच्या 11 वर्षांच्या सामाजिक कार्याचा आढावा मांडला, तर आभार प्रदर्शन अथर्व कदम यांनी केले.






