पुणे: पुणे आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये रोज प्रवास करणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांसाठी अखेर मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा आता प्रत्यक्षात सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या बहुप्रतिक्षित मेट्रोचे उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हिंजवडी, वाकड, बालेवाडी आणि गणेशखिंड मार्गावरील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा हा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ यांच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे. पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) या मार्गाची तपासणी पूर्ण झाली असून, व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी सुमारे दहा दिवस लागू शकतात.

मुळात हा मेट्रो मार्ग गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र भूसंपादन, गणेशखिंड रस्त्यावरील कामातील विलंब आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पाची मुदत वारंवार पुढे ढकलली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी १५ जुलैपर्यंत सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. मात्र तो मुहूर्तही हुकल्यानंतर आता जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.
कामातील विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चात सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र या वाढीव खर्चाचा कोणताही आर्थिक भार राज्य सरकार किंवा नागरिकांवर पडणार नसून तो ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ कंपनी उचलणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या मेट्रो मार्गावरील सर्व स्थानकांवर पूर्ण क्षमतेने सेवा सुरू होण्यासाठी मार्च २०२७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी पहिल्या टप्प्याची सेवा सुरू होताच हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. तसेच गणेशखिंड रस्ता, बाणेर, बालेवाडी आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीतही मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







