पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पक्षातील नेतृत्वाच्या समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः त्या पत्रात प्रफुल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख टाळण्यात आल्याने त्यांना त्या पदावरून हटवण्यात आले का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या घडामोडींची पार्श्वभूमी पाहिली तर, 16 फेब्रुवारी 2026 रोजी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या घटनेत बदल करण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. कार्याध्यक्ष पदाला अधिक अधिकार देण्याचा प्रस्ताव या पत्रात होता. मात्र त्यानंतर 10 मार्च रोजी सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्र पत्र पाठवत 28 जानेवारीनंतरचा कोणताही पत्रव्यवहार वैध धरू नये, अशी विनंती आयोगाकडे केली. यात पटेल आणि तटकरे यांच्या पत्रांचा अप्रत्यक्षपणे निषेध करण्यात आल्याचे मानले जात आहे.
या घडामोडींनंतर पक्षात खळबळ उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईत वरिष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर प्रफुल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
मात्र या स्पष्टीकरणानंतरही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार समाधान झालेलं नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद अजूनही कायम असल्याचे दिसत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रफुल पटेल यांची कार्याध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली का, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे. मात्र याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत पक्षातील सत्तासंतुलनावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







