पुणे : शिवकालीन शौर्याचा साक्षीदार असलेल्या सिंहगड किल्ल्याच्या सर्वंकष संवर्धनासाठी तयार करण्यात आलेला २८८ कोटी रुपयांचा आराखडा गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आराखड्याला मंजुरी मिळत नसल्याने संवर्धनाची मोठी कामे रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात पुरातत्त्व विभागाच्या कामांसाठी ११ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा आणि किल्ल्याच्या तटबंदीची दुरुस्ती केली जाणार आहे. याशिवाय किल्ल्यावरील पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अन्य पायाभूत सुविधांसाठी आणखी १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षी सिंहगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी २८८ कोटी रुपयांचा सर्वंकष विकास आराखडा तयार केला होता. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर या आराखड्याचे सादरीकरण केले होते.

मात्र, जानेवारी महिन्यात अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर या आराखड्याबाबत राज्यस्तरावर ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी, चार विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अद्याप गती मिळालेली नाही.

संपूर्ण आराखड्याच्या मंजुरीची प्रतीक्षा न करता किल्ल्यावरील अत्यावश्यक कामे सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील सुमारे ४० कोटी रुपयांच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
सिंहगडावर कोणती कामे होणार?
दरवाजे आणि तटबंदी : पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा आणि किल्ल्याच्या तटबंदीची दुरुस्ती केली जाणार आहे.
पाणीपुरवठा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे.
अंतर्गत सुविधा : किल्ल्यावरील पायवाटा, पायऱ्या, सीमाभिंत आणि रेलिंगची कामे केली जाणार आहेत.
पर्यटक सुविधा : पार्किंग, प्रकाशयोजना, संग्रहालय आणि प्रदर्शन क्षेत्राचा विकास करण्याचे नियोजन आहे.
ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन : शिवकालीन बांधकामशैलीनुसार ऐतिहासिक वास्तूंची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे.
सुरक्षा व्यवस्था : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन सेवा आणि आवश्यक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.
सिंहगड संवर्धनाच्या विकास आराखड्यात मोरदरी, कल्याण, मोगरवाडी, खामगाव मावळ, भगतवाडी, सांबरेवाडी आणि आतेकरवाडी या गावांचा समावेश आहे. किल्ल्याच्या संवर्धनासोबतच या परिसरातील पायाभूत सुविधा आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी विकसित करण्याचे नियोजन आहे.
सिंहगड किल्ल्याचा विकास आराखडा राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. मात्र, किल्ल्याच्या संवर्धनासाठी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशानुसार जिल्हा नियोजन समितीतून पहिल्या टप्प्यात ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उर्वरित कामांसाठीही निधी मंजूर करण्यात येणार असून, त्यामुळे किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुमारे ४० कोटी रुपये उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.






