पुणे: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, पुणे जिल्ह्यातील शिरूर-वाघोली आणि अलीकडेच उघडकीस आलेल्या यवत येथील गर्भलिंग निदान प्रकरणांमध्ये एक महत्त्वाचा समान दुवा समोर आला आहे. या तिन्ही प्रकरणांच्या तपासादरम्यान नरेंद्र साहेबराव ठाकरे याचे नाव समोर आल्याने गर्भलिंग निदानाच्या अवैध साखळीमागे त्याची महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

मार्च 2026 मध्ये वाघोली परिसरात झालेल्या कारवाईत नरेंद्र ठाकरे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राहाता तालुक्यात उघडकीस आलेल्या मोबाइल गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासातही त्याचे नाव एजंट म्हणून पुढे आले. आता यवत येथील प्रकरणात वापरण्यात आलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या पुरवठ्याशी त्याचा संबंध असल्याची माहिती समोर येत असल्याने या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
मार्च महिन्यात गुन्हे शाखेने डोकसावंगी येथे छापा टाकून ठाकरेला ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले साहित्य, आर्थिक व्यवहार, विविध जिल्ह्यांतील संपर्क तसेच पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रांच्या पुरवठ्याबाबत सखोल चौकशी झाली होती का, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यवत प्रकरणात पुन्हा एकदा त्याचे नाव समोर आल्यामुळे पूर्वीच्या तपासाच्या व्याप्तीवरही चर्चा सुरू झाली आहे.
तपासाशी संबंधित सूत्रांच्या मते, मार्चमधील कारवाईनंतर संपूर्ण नेटवर्कचा माग काढण्यात यश आले असते, तर यवत परिसरात मे आणि जून महिन्यात समोर आलेले कथित मोठे रॅकेट आधीच उघडकीस आले असते. त्यामुळे तपासातील काही महत्त्वाचे धागेदोरे दुर्लक्षित राहिले का, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे.
यवत प्रकरणाच्या तपासात 12 ते 15 डॉक्टरांशी संबंधित संपर्कांची माहिती समोर आली आहे. तसेच हजारो महिलांची बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका गावापुरते किंवा जिल्ह्यापुरते मर्यादित नसून राज्यभर पसरलेल्या नेटवर्कचा भाग असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राहाता, शिरूर-वाघोली आणि यवत या तिन्ही ठिकाणच्या तपासातील माहिती एकत्रित केल्यानंतर नरेंद्र ठाकरेची नेमकी भूमिका आणि या संपूर्ण साखळीचे स्वरूप अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.







