Sharad Pawar : मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीच्या (Rajya Sabha elections) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला. शरद पवार गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 आमदारांचे समर्थनपत्रही तयार ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एकूण 7 जागा लवकरच रिक्त होणार आहेत. या जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या 4 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीत चर्चा सुरू होती. अखेर शरद पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार स्वतः उपस्थित राहतील की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे ते प्रत्यक्ष निवडणूक कार्यालयात जाण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी त्यांच्या निवासस्थानी जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अलीकडेच त्यांना मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते सध्या विश्रांती घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी एकत्र असून पवार यांना सर्व घटक पक्षांचा पाठिंबा असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




