Pune Shankhnaad World Record Book of India: पारंपरिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या विशेष सोहळ्यात तब्बल 1,111 हून अधिक शंखवादकांनी एकत्रित शंखनाद करत विश्वविक्रमाची नोंद केली. पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर हा भव्य सोहळा पार पडला. ‘केशव शंखनाद पथका’च्या वतीने या विश्वविक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या ऐतिहासिक सोहळ्यात प्रत्यक्षात सुमारे 1,400 शंखवादक सहभागी झाले होते. विशेष रचनेत सात नादात्मक आवर्तनांतून शंखनाद सादर करण्यात आले. यामध्ये ‘ब्रह्मनाद’, ‘सप्तखंड’, ‘अर्धवलय’, ‘तुतारी’, ‘पूर्णवलय’, ‘सुदर्शन’ आणि ‘मुक्तछंदनाद’ अशा सात आवर्तनांचा समावेश होता. या नादमय आवर्तनांसोबत तीन मंत्रांची सुद्धा शंखाद्वारे सादरीकरण करण्यात आले.या विश्वविक्रमाची अधिकृत नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ मध्ये झाली आहे. (Pune Shankhnaad World Record Book of India)
या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष महंत योगी रोहतास नाथ महाराज, जगदगुरुकृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण, अतिरिक्त पोलीस महासंचालक (IPS) कृष्ण प्रकाश, तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, महेश सूर्यवंशी, ढोल पथक महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, गायक अवधूत गांधी, दिग्दर्शक दिगपाल लांजेकर पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
हा सोहळा केवळ शंखनादाचा नसून, भारतीय परंपरा, संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाचा जागर करणारा एक अनोखा अनुभव ठरला.







