पिंपरी-चिंचवड : ‘सकाळी माझ्याकडे का बघत होतास?’ अशी विचारणा करत एका व्यक्तीवर बेदम मारहाण करून धारदार कटरने चेहऱ्यावर वार केल्याची घटना पिंपरीतील गांधीनगर परिसरात घडली. शनिवारी (ता. २१ नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

याप्रकरणी सत्यम काळूराम शिंदे (वय २८, रा. गांधीनगर, पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी व्यक्तीच्या पत्नीने रविवारी (ता. २२ नोव्हेंबर) संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती किराणा दुकानाजवळ दुचाकी उभी करत होते. त्यावेळी तोंडओळख असलेल्या संशयिताने त्यांच्याकडे सकाळी का पाहत होता, अशी विचारणा करत वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सिमेंटच्या गट्टूनेही मारहाण केल्याचा आरोप आहे.

इतक्यावरच न थांबता संशयिताने धारदार कटरने त्यांच्या चेहऱ्यावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.






