Pune School News: पुणे : पुणे शहरातील एका नामांकित शाळेत नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वर्तनामुळे मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित विद्यार्थिनीने थेट आपल्या शिक्षिकेला प्रपोज केला असून सातत्याने मोबाईलवर संदेश पाठवून मानसिक ताण निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शाळेतील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. मात्र वेळीच समुपदेशन करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा- Loni Kalbhor News: कदमवाकवस्ती येथे अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे 5 लाखांचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेच्या मोबाईलवर सातत्याने हार्टच्या इमोजींसह संदेश येऊ लागले. या संदेशांमध्ये तुम्ही मला आवडता, तुम्ही इतरांशी बोलू नका, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही अशा आशयाचा उल्लेख होता. शिक्षिकेने सुरुवातीला हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थिनीचे वर्तन वाढतच गेले. समजावून सांगूनही ती ऐकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने शाळा प्रशासनाला याबाबत माहिती दिली.
ब्लेडने हात कापला
यानंतर या प्रकरणात आणखी गंभीर बाबी समोर आल्या. विद्यार्थिनीने आपल्या हातावर ब्लेडने शिक्षिकेचे नाव कोरल्याचे तसेच प्रेम स्वीकारले नाही तर शाळेच्या सातव्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी दिल्याचे उघड झाले. यामुळे शिक्षक आणि प्रशासन अधिकच चिंतेत पडले.
गैरवर्तन सुरुच
चौकशीत असेही समोर आले की, काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीने तिच्याच वर्गातील एका मुलीला वॉशरूममध्ये गाठून वैयक्तिक प्रश्न विचारले होते. घाबरलेल्या त्या विद्यार्थिनीने उपमुख्याध्यापिकांकडे तक्रार केली. नववीतील 4 ते 5 मुलींना देखील तिने आय लव्ह यू असे संदेश पाठवले होते. काहींना अंगठी घालण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली. वर्गात न बसता शाळेत फिरणे आणि शिक्षिकेकडे सतत पाहणे हे तिचे रोजचेच झाले होते.
घडामोडी गंभीर असल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी दामिनी मार्शलशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने शाळेत भेट देऊन मानसशास्त्रीय पद्धतीने समुपदेशन केले. पोलिसी कारवाई न करता विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेतले. वेळेवर केलेल्या समुपदेशनामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून शाळा प्रशासनानेही पुढील काळात योग्य काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.






