पुणे : आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावरील हडपसर (Pune Road Closed) ते दिवेघाट दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी 23 फेब्रुवारी रोजी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. या कामामुळे दुपारी 13.00 ते 15.00 या कालावधीत संबंधित मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.

दिवेघाट परिसरात सध्या महामार्गाचे रुंदीकरण आणि सुरक्षाविषयक कामे सुरू आहेत. डोंगराळ भागात खडक फोडण्याचे काम ब्लास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा धोका टाळण्यासाठी पोलिस आणि संबंधित यंत्रणा सतर्क राहणार आहेत.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नागरिकांना या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. हडपसर, सासवड किंवा इतर मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः मालवाहतूक आणि जड वाहनचालकांनी वेळेचे नियोजन करून प्रवास करावा, असेही सांगण्यात आले आहे.
ब्लास्टिंगचे काम वेळेत पूर्ण करून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मात्र दिलेल्या वेळेत संबंधित मार्ग टाळावा, अन्यथा वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागू शकते. वाहतूक शाखेने नागरिकांनी सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांनी या संदर्भात आदेश जारी केले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.






