पुणे: पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगर येथे दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराची हातोड्याने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांना मारहाण केल्याच्या रागातून तरुणाने हा हल्ला केल्याचा आरोप असून, मार्केटयार्ड पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

सतिश गुलाब शिरसाठ (वय २५, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे मृत तरुणाचे नाव असून, सोनू अंकुश साठे (वय ३०, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गौरव श्रीकांत बदक यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आंबेडकरनगर येथील संतोष साठे यांच्या पत्र्याच्या खोलीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश शिरसाठ याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. तो मार्केटयार्ड परिसरात मोलमजुरी करत होता. त्याचा भाऊ अमित शिरसाठ हा एका खून प्रकरणात येरवडा कारागृहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शुक्रवारी रात्री सतिश दारूच्या नशेत सोनू साठे यांच्या घरी गेला. त्यावेळी त्याचा सोनूचे वडील अंकुश साठे यांच्याशी वाद झाला. वाद वाढल्यानंतर सतिशने अंकुश साठे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या सोनू साठे याने सतिशच्या तोंडावर आणि डोक्यावर हातोड्याने वार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हल्ल्यात सतिश गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मार्केटयार्ड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सोनू साठे याला ताब्यात घेतले.
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, पुढील तपासासाठी त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कटारे करीत आहेत.







