प्रतिनिधी अमित मुंडीक

पुणे: सार्वजनिक बसमधील (Pune News) गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. PMPML बसमध्ये एका महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 2 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्यात एक महिला भोसरी ते बालाजीनगर असा बस प्रवास करत होत्या. बसमध्ये प्रचंड गर्दी होती, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अतिशय चालाखीने त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी लंपास केली. बसमधून उतरल्यावर हा प्रकार लक्षात येताच महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली होती.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार अमोल पवार यांना आपल्या गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. तांत्रिक तपासात ही चोरी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गोविंद गायकवाड आणि त्याच्या साथीदाराने केल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली की, मुख्य आरोपी गोविंद गायकवाड हा आधीच सिंधुदुर्गमधील एका गुन्ह्यात ओरस येथील जिल्हा कारागृहात बंद होता. पोलिसांनी तात्काळ हालचाली करत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि गोविंदसह त्याचा साथीदार वैभव गायकवाड (दोघेही रा. मुंढवा) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
गोविंद गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्नाचे 3, मारामारीचा 1 व चोरीचे 9 असे एकूण 13 गुन्हे, तर वैभव गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्न 1, जबरी चोरी 1 व चोरी 2 असे एकूण 4 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार घोडसे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.







