पोपट पाचंगे

Pune News: रांजणगाव गणपती : पुणे – अहिल्यानगर महामार्गावर दिवसेंदिवस होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, रोजच्या वाहतूककोंडीच्या समस्येमुळे मानसिक त्रास सहन करण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.
या महामार्गावर झपाट्याने वाढलेले औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या आणि अपुरी रस्ते व्यवस्था यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.
औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा वाढली आहे. मात्र त्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्ग किंवा ट्रॅफिक नियोजन करण्यात प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. परिणामी सकाळ व संध्याकाळच्या वेळी मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागतात. एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये कामावर जाण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच कामगारांना दररोज घरातून लवकर निघावे लागत आहे. रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ दुप्पट होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढताना दिसत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने व पत्रव्यवहार करूनही केवळ आश्वासनांवर हा महत्त्वाचा प्रश्न अडकून राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कागदोपत्री निर्णय होत असले तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल दिसत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
दरम्यान, वाढत्या वाहतुकीच्या समस्येमुळे औद्योगिक विकासावरही परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. भविष्यात नवीन उद्योग येण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विद्यमान उद्योग स्थलांतरित झाल्यास स्थानिक रोजगार, हॉटेल व्यवसाय, फेरीवाले व छोट्या दुकानदारांवर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो.
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने वाहतूक नियोजन, रस्त्यांचे रुंदीकरण व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
पुणे – अहिल्यानगर महामार्ग या मुख्य रस्त्यावरील शिरूर ते शिक्रापूर या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण
अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गाची निर्मिती
ट्रॅफिक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती
औद्योगिक वसाहतीसाठी पर्यायी बायपास रस्ता
सिग्नल व्यवस्था व वाहतूक नियोजन त्वरित लागू करणे






