पुणे: पुणे (Pune News) शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेचा कणा असलेल्या रावेत उपसा केंद्रांतर्गत महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेण्यात आले आहे. नियोजित विकासकामांसाठी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित (Shift) केली जाणार असल्याने, बुधवारी (२१ जानेवारी) पुण्यातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

पुणे शहराला पाणी पुरवणारी रावेत येथील मुख्य जलवाहिनी एका महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये अडथळा ठरत होती. ही वाहिनी सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी महापालिकेने बुधवारी विशेष ‘शटडाउन’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुरुस्तीनंतर गुरुवारी (२२ जानेवारी) सकाळी पाणी उशिरा आणि कमी दाबाने येण्याची शक्यता आहे.

कळस, म्हस्के वस्ती, संजय पार्क, बर्माशेल परिसर, माळवाडी, जाधव वस्ती, गणेशनगर (बोपखेल), विश्रांतवाडीचा काही भाग, आणि लोहगाव विमानतळ परिसर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

जुन्या वाहिन्या बदलल्यामुळे गळतीचे प्रमाण कमी होईल आणि भविष्यात अचानक उद्भवणारे तांत्रिक बिघाड टाळता येतील. दरम्यान, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







