Pune News: पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे (Pune) शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरभर गस्त वाढवली आहे. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबत माहिती देताना नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

शहरातील धार्मिक स्थळे, प्रमुख चौक, बाजारपेठा, मॉल्स, बसस्थानके आणि रेल्वे स्थानके या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये पायी गस्त वाढवण्यात आली असून सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे देखरेख अधिक मजबूत करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन सतर्क असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी 112 हा आपत्कालीन क्रमांक उपलब्ध आहे. तसेच जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुण्यात सध्या सुमारे 120 ते 125 इराणी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती विशेष शाखेकडून देण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, व्यावसायिक आणि वैद्यकीय कारणांसाठी आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. सुमारे 30 इराणी महिला विवाहानंतर येथे स्थायिक झाल्या आहेत, तर जवळपास 60 विद्यार्थी विविध महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. ज्यांच्या व्हिसाची मुदत संपत आहे, त्यांना नियमांनुसार मदत केली जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. वाढीव सुरक्षा ही केवळ खबरदारी म्हणून करण्यात आली असून कोणत्याही समुदायाला लक्ष्य केलेले नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.






