लोणी काळभोर, ता. 07 : हवेली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी (ता. 09) होत असून या महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या दोन महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्यासह हवेली तालुक्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून जोरदार लॉबिंग आणि गाठीभेटी सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

महिनाभरापूर्वी झालेल्या हवेली पंचायत समितीच्या 12 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सर्वाधिक 6 जागांवर विजयी झाली. तर भाजपाने 4, शिवसेना शिंदे गटाने 1 आणि 1 जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. स्पष्ट बहुमतासाठी 7 हा आकडा आवश्यक असताना कोणत्याही पक्षाला तो गाठता आला नव्हता. मात्र, लोणी काळभोर वडकी गणातून अपक्ष निवडून आलेल्या विद्या गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ 7 वर पोहोचले असून सत्तेचा ‘मॅजिक फिगर’ राष्ट्रवादीने पार केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सभापती व उपसभापती पदावर राष्ट्रवादीची पकड मजबूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हवेली पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण वर्गाकडे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेऊर गणातील युवराज काकडे व कोरेगाव मूळ गणातील कृषिराज चौधरी या दोन उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली असून या दोघांपैकी एकाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. तर उपसभापती पदासाठीचे नाव अद्याप पक्ष नेतृत्वाने गुलदस्त्यात ठेवले आहे.
याच पार्श्वभूमीवर खानापूर गणाचे सदस्य युवराज नारायण वांजळे यांची गटनेतेपदी झालेली निवडही तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची ठरली आहे. या घडामोडींमुळे पंचायत समितीच्या सत्तासमीकरणाला नवी कलाटणी मिळाली असून उद्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, एकूणच सभापतीपदाच्या निवडणुकीत प्रतिष्ठेची लढत रंगणार असून कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ पडणार, याचा फैसला सोमवारी होणार आहे. त्यामुळे हवेली पंचायत समितीतील उद्याची विशेष सभा तालुक्याच्या राजकारणात निर्णायक ठरणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
निवडणूक कार्यक्रम
सकाळी 11.00 ते 11.30 : सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशन स्वीकारणे.
सकाळी 11.31 ते 12.00 : विशेष सभेचे कामकाज सुरू करणे व नामनिर्देशनाची छाननी करणे.
दुपारी 12.01 ते 12.30 : नामनिर्देशन पत्र माघार घेणे.
दुपारी 12.31 पासून पुढे : आवश्यक असल्यास मतदान घेऊन निकाल जाहीर करणे.







