Pune News: पुणे: शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येला तोडगा काढण्यासाठी नव्या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव पुढे आला आहे. कोंढवा ते येवलेवाडी दरम्यान सुमारे 20 किमी लांबीची मार्गिका उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे विशेषत: दक्षिण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दररोजच्या ट्रॅफिकमधून (Traffic) सुटका होऊन प्रवास अधिक सोयीचा आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. (Pune Metro News)

प्रस्तावित मार्ग शिवाजीनगरपासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प आणि पुलगेट मार्गे कोंढवा व येवलेवाडीपर्यंत जाणार आहे. साधारण प्रत्येक 1 किमी अंतरावर मेट्रो स्थानक असतील, त्यामुळे परिसरातील रहिवाशांना सहज प्रवास करता येईल. या मार्गाचा उद्देश 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचा आहे.
महामेट्रोमार्फत कोंढवा ते येवलेवाडी हा भाग उभारला जाणार आहे. तसेच एनआयबीएम ते उंड्री या भागासाठीही विस्ताराचा विचार सुरू आहे. ज्योती चौक, एनआयबीएम जंक्शन आणि पुढे उंड्रीपर्यंत सेवा वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याशिवाय कॅम्प-पुलगेट भागातून जोडणी करण्याचाही विचार सुरू आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या सुमारे 23 किमी मार्गिकेचा विस्तार सार्वजनिक-खासगी भागीदारीत उभारला जात आहे. या सर्व योजनांमुळे शहरातील विविध भाग एकमेकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाणार आहेत. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण पुणेकरांना कमी वेळात आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.





