पुणे: पुण्यातून एक मन सुन्न (Pune News) करणारी घटना समोर आली आहे. खडकी परिसरातील चिखलवाडी येथील ‘ओरियन कॉम्प्लेक्स’मध्ये एका उच्चशिक्षित पतीने आपल्या 53 वर्षीय पत्नीची झोपेतच निर्घृण हत्या केली. घरगुती कलह, चारित्र्यावर संशय आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

रिअल इस्टेट व्यावसायिक असलेला 56 वर्षीय आरोपी दिलीप नंबुरी कंडाथील याने पत्नी बिंदू (53) गाढ झोपेत असताना दिलीप याने त्यांच्या चेहऱ्यावर ब्लँकेट दाबले आणि श्वास रोखल्यामुळे बिंदू यांचा जागीच मृत्यू झाला. हृदयद्रावक बाब म्हणजे, पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारीच बसून होता. सकाळी 8 वाजता त्याने स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला (११२) फोन करून, “मी माझ्या पत्नीला संपवलं आहे, मला अटक करा,” अशी कबुली दिली.
बिंदू या गेल्या काही काळापासून नैराश्यावर उपचार घेत होत्या. पती त्याच्या पहिल्या पत्नीला गुपचूप भेटत असल्याचा त्यांना संशय होता, ज्यावरून घरात रोज वाद होत होते.
रिअल इस्टेट व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने दिलीप कर्जबाजारी झाला होता. व्यवसायातील अपयश आणि घरातील कटकटी यामुळे तो प्रचंड मानसिक दडपणाखाली होता. या प्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







