Pune News: पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विकासकामांबाबत महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीदरम्यान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी केली. तसेच या उड्डाणपुलाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली. विद्यापीठ चौक परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने हा प्रकल्प लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील इतर प्रश्नांकडेही लक्ष वेधण्यात आले. शहरातील काही भागांमध्ये ओव्हरहेड वीज तारा धोकादायक स्थितीत असल्याचे नमूद करत त्या तारा भूमिगत करण्यासाठी आवश्यक निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे काम प्राधान्याने करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे पुणे महानगरपालिकेत विलीनीकरण लवकर करावे, असेही बैठकीत सांगण्यात आले. विलीनीकरण झाल्यास प्रशासन एकसमान होईल आणि नागरिकांना सेवा देण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल, असे मत मांडण्यात आले.
याशिवाय पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. बैठकीत मांडलेल्या सर्व विषयांवर संबंधित विभागांकडून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.






