पुणे: पुण्यातील उत्तमनगर परिसरात (Pune News) एक अशी दुर्दैवी घटना घडली आपतीसोबत दुचाकीवर सुरक्षित घरी पोहोचणार तेवढ्यात 37 वर्षीय महिलेचा रस्त्यातच करुण अंत झाला. मात्र, हा केवळ अपघात नसून ‘चूक’ असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याच कारणास्तव, पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी पतीविरुद्धच गुन्हा दाखल केला आहे.

शर्ली एन. अन्थोनी ( रा. उत्तमनगर) या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून एनडीए रस्त्यावरील भाजी मंडई चौकातून जात होत्या. भाजी खरेदी करून घरी परतताना अचानक दुचाकी घसरली. हा अपघात इतका भीषण होता की, शर्ली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शर्ली यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला होता.
अपघात झाला असे म्हणून आपण सोडून देतो. मात्र, उत्तमनगर पोलिसांनी या घटनेचा बारकाईने तपास केला असता, भरधाव वेगामुळेच पतीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. रहदारीच्या रस्त्यावर सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने हा जीवघेणा अपघात झाला. अनेकदा आपण वेग मर्यादा ओलांडतो. या घटनेत डोक्याला झालेली दुखापत जीवघेणी ठरली.







