पुणे: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार (Pune Mahanagarpalika) समोर आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या कर संकलन विभागात एका व्यक्तीने आपले बिल निघत नसल्याच्या कारणावरून रिव्हॉल्व्हर काढत आत्महत्येची धमकी दिल्याची घटना घडली. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Breaking News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील एक रहिवासी गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या कर विभागात आपले थकीत बिल काढण्यासाठी आणि कर भरण्यासाठी सतत चकरा मारत होता. संबंधित व्यक्तीने अधिकाऱ्यांकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अभय योजनेचा अखेरचा दिवस असल्याने तो अधिकच हताश झाला होता.
आज दुपारी तो कर विभागाच्या कार्यालयात गेला असता, अधिकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर त्याने आपल्या जवळील रिव्हॉल्व्हर काढून स्वतःच्या डोक्याला लावत आत्महत्या करण्याची धमकी दिली. या घटनेमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेले रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले असून ते परवानाधारक आहे की नाही, याची चौकशी सुरू आहे. तसेच कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून नेमका प्रकार काय घडला, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या घटनेमुळे महापालिकेतील कामकाज पद्धतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांना वेळेत सेवा मिळणे आणि तक्रारींचे तत्काळ निराकरण होणे किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा जाणीव झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.







