पुणे: पुण्यातील दिघी परिसरात एका सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये (Pune Lift Accident CCTV) घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. लिफ्टचा दरवाजा बंद होत असताना एका लहान बाळाचा हात दरवाज्यात अडकल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुदैवाने या घटनेत बाळाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र काही क्षण निर्माण झालेली भीती आणि गोंधळ स्पष्टपणे दिसून येतो. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दिघीतील एका सोसायटीमध्ये काही महिला आणि पुरुष लिफ्टमधून उतरत होते. त्यावेळी एका महिलेच्या हातात लहान बाळ होते. लिफ्टचा दरवाजा बंद होण्याच्या क्षणी अचानक बाळाचा हात दरवाज्यात अडकला. ही घटना घडताच लिफ्टमध्ये उपस्थित असलेल्या लोकांमध्ये काही क्षणांसाठी गोंधळ उडाला.


घटनास्थळी उपस्थित महिलांनी आणि नागरिकांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत लिफ्ट थांबवण्याचा प्रयत्न केला. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर बाळाचा हात सुरक्षितपणे दरवाज्यातून बाहेर काढण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये काही सेकंदांमध्ये घडलेला प्रसंग आणि नागरिकांची धावपळ स्पष्ट दिसते.
या घटनेनंतर लिफ्ट वापरताना विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. विशेषतः लहान मुलांसोबत किंवा बाळांना हातात घेऊन लिफ्टमध्ये ये-जा करताना दरवाज्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आणि लिफ्ट पूर्णपणे उघडे किंवा बंद होईपर्यंत थांबणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सोसायटी व्यवस्थापनांनीही लिफ्टच्या सुरक्षाव्यवस्थेची नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याची चर्चा या घटनेनंतर सुरू झाली आहे.







