Pune Leopard: पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या घटना घडताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर वन विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Leopard)

बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नियंत्रण कक्ष हा 24 तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी टोल-फ्री क्रमांक 18003033 जारी करण्यात आला आहे.अशी माहिती असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव तालुक्यातून गेल्या महिनाभरात जवळपास 17 बिबटे पकडण्यात आले आहेत. त्यानंतर पकडलेले हे बिबटे जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. बिबट्याच्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण पाहता जिल्हाधिकारी कार्यालयात डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर बैठक घेण्यात आली. यावेळी जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, तसेच प्रादेशिक आणि वन्यजीव विभागाच्या इतर अधिकाऱ्यांची उपस्थित होती.
बैठकीत महत्वाचा निर्णय
जिल्हाधिकारीकार्यालयात बैठकीदरम्यान बिबट्या ग्रस्त अतिसंवेदनशील गावांमध्ये एआय प्रणाली, कॅमेरा ट्रॅप्स, सोलार नाईट सर्व्हिलन्स ड्रोन, आणि साउंड अलर्ट सिस्टीम बसविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. बिबट्यांना पकडण्यासाठी बाहेरील जिल्हे आणि राज्यांमधून साधारण 700 पिंजरे खरेदी करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच गावपातळीवर सहनियंत्रण समित्या तयार केल्या जाणार आहेत. या समित्यांमध्ये गावातील अनुभवी लोक, वन मित्र, इतर स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. एआय प्रणाली आणि ड्रोनच्या मदतीने गावातील बिबट्यांची संख्या शोधली जाणार आहे. त्यानुसार बिबट्याचा वावर असणाऱ्या गावात समितीकडून जनजागृती केली जाणार आहे.
तसेच यावेळी बैठकीत पोलिस अधीक्षकांच्या पातळीवर टायगर सेलची बैठक घेण्यात येणार आहे. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांमध्ये समन्वय वाढविण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी दिले.





