Pune Crime: शहरातून एक धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या शिक्षिका पत्नीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह लोखंडी भट्टीमध्ये जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या ‘दृश्यम’ स्टाईल हत्याकांडाचा छडा वारजे माळवाडी पोलिसांनी लावला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर जाधव (फॅब्रिकेशन व्यावसायिक, मूळचा अमरावतीचा) असे आरोपीचे, तर अंजली समीर जाधव (खासगी शिक्षिका) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना दोन मुले आहेत. हे दोघे शिवणे परिसरात राहत होते.
पूर्वनियोजित कट आणि हत्या (Pune latest Crime)
पोलिसांच्या तपासानुसार, समीर जाधव याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यातूनच तो पत्नी अंजलीवर वारंवार अनैतिक संबंधांचा संशय घेत होता. एका मित्राच्या मोबाईलवर ‘आय लव्ह यू’चा मेसेज पाठवून त्याला स्वतःच रिप्लाय देत त्याने पत्नीवर संशय घेतला. या संशयातूनच त्याने पूर्वनियोजित कट रचला.
हेही वाचा: मोठी बातमी..! मुंडेंसोबत वाद.., जरांगे पाटलांना मुंबई पोलीसांचं समन्स; ‘या’ प्रकरणात होणार चौकशी…
26 ऑक्टोबर रोजी समीरने खेड-शिवापूरजवळ गोगलवाडी येथे भाड्याने घेतलेल्या गोदामात अंजलीला घेऊन गेला. तिथे त्याने तिचा गळा दाबून खून केला. हत्या केल्यानंतर त्याने गोदामात लोखंडी भट्टी तयार केली आणि पत्नीचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर भट्टी आणि राखही नदीत फेकून दिली आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना ज्या वेळी घडली त्यावेळी त्यांची दोन मुले दिवाळीच्या सुट्टीमुळे गावी गेली होती.
मिसिंग’ची खोटी तक्रार
हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी समीर जाधव याने दुसऱ्याच दिवशी स्वतः वारजे माळवाडी पोलीस ठाणे गाठले आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पत्नीच्या शोधासाठी तो वारंवार पोलीस ठाण्यात येऊन कळकळीने चौकशी करत असायचा.
मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासणी केली असता, तक्रारदार पतीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. कसून चौकशी केल्यावर त्यानेच पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आणि या क्रूर हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी आरोपी समीर जाधवविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.







