लोणी काळभोर, (पुणे) : विविध रंगीत फुलांनी सजलेले अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथे संकष्टी चतुर्थीला श्री. चिंतामणी मंदिरात शनिवारी (ता. 08) पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

चंदनाचा लेप लावलेल्या स्वयंभू मुर्तीला हारतुऱ्यांची सजावट, धुप अत्तराचा दरवळत असलेला सुंगध यातून ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने पहाटेपासूनच भाविकांनी चिंतामणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
पहाटे पुजारी राहुल आगलावे यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त केशव विद्वांस उपस्थित होते. देवस्थान तर्फे मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आले होते, दर्शनबारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. थेऊर परिसरात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने ह.भ.प.विष्णू महाराज जेठे यांचे सुभाष्य कीर्तन झाले. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त केशव विद्वांस मंदिर परिसरात लक्ष ठेवून होते.







